महाड । मिलिंद माने
महाड शहरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील नामांकित ‘सुनील गांधी क्लासेस’चा चालक सुनील गांधी याने एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे वर्षभर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराध संरक्षण (पोक्सो) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालक दहावीत शिकत असताना तांबड भुवन येथील सुनील गांधी यांच्या क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होता. १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत आरोपीने वेळोवेळी या मुलाचा लैंगिक छळ केला. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान आरोपीने पीडित बालकास क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या बेडरुममध्ये नेले. तिथे त्याला जबरदस्तीने बेडवर झोपवून, त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले. या निंदनीय प्रकारामुळे पीडित बालक मानसिक दडपणाखाली होते, मात्र अखेर हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.
याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १० आणि १८ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी सुनील गांधी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी हे करत आहेत. एका नामांकित क्लास चालकाकडून असे घृणास्पद कृत्य घडल्याने शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा प्रकारचे हे एकमेव प्रकरण आहे की आरोपीने अजूनही काही मुलांचे शोषण केले आहे, याबाबत आता पालकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत.
