उद्घाटनानंतर एकही दिवस प्रक्रिया नाही | यंत्रसामग्रीला गंज; प्रशासकीय उदासीनतेचा फटका
दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे. कोट्यवधींच्या निधीतून उभारलेले दोन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून बंदावस्थेत असून, यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, मोठ्या दिमाखात उद्घाटन होऊनही आजतागायत या ठिकाणी एकाही किलो कचऱ्यावर प्रक्रिया झालेली नाही.
५० लाखांचा प्रकल्प उद्घाटनानंतरही ठप्प
जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत नागरी सुविधा योजनेतून दिवेआगर येथे ५० लाख रुपये खर्चून कचरा विघटन प्रकल्प उभारण्यात आला. या खर्चापैकी १२ टक्के वाटा ग्रामपंचायतीने उचलला होता. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खासदार सुनील तटकरे आणि आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, उद्घाटनाचा नारळ फुटल्यापासून हा प्रकल्प एकदाही सुरू झाला नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचा मूळ उद्देशच हरवला असून, प्रकल्पाची संरक्षण भिंत आणि महागड्या यंत्रसामग्रीला आता गंज चढू लागला आहे.
१६ लाखांचा प्लास्टिक प्रकल्पही धूळखात
केवळ घनकचराच नव्हे, तर रायगड जिल्हा परिषदेने १६ लाख रुपये खर्चून उभारलेला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पही याच वाटेवर आहे. २०२४ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले, परंतु अद्याप तो कार्यान्वित झालेला नाही. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असतानाही दिवेआगरमधील ही सुविधा बंद का आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासकीय उत्तरांची ‘फेकाफेक’
प्रकल्पाच्या दुरवस्थेबाबत प्रशासकीय पातळीवर केवळ चौकशी आणि आश्वासने दिली जात आहेत.
“निवडणूक आचारसंहिता आणि काही प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. आता ग्रामपंचायतीच्या ८ सदस्यांची पोटनिवडणूक झाल्यानंतर यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”
— वसीम फकजी, सरपंच, दिवेआगर
“दिवेआगर येथील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप बंद का आहे, याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.”
— राजेंद्र किरवे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन
पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या दिवेआगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना, लाखो रुपये खर्च करूनही यंत्रणा कार्यान्वित होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
