उरण | घन:श्याम कडू
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता उरणच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले असून तालुक्यात एलपीजी सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे महागाईने कंबरडे मोडले असताना दुसरीकडे ‘शकुंतला गॅस एजन्सी’चे अनधिकृत गोडाऊन आणि सिलेंडरचा काळाबाजार यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपले धंदे तात्पुरते बंद केले आहेत. घरगुती सिलेंडरसाठी ३५ ते ४० दिवस वाट पाहावी लागत असल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गॅसअभावी अनेक घरांमध्ये पुन्हा लाकडाच्या चुली पेटल्या असून तालुक्यात जणू ‘गॅस काळ’ सुरू झाल्याचे चित्र आहे.
शेतात बेकायदेशीर साठवणूक?
उरण-करंजा रस्त्यालगत भर शेतामध्ये शकुंतला गॅस एजन्सीचे गोडाऊन सुरू असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गोडाऊनसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. चाणजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “या गोडाऊनबाबत ग्रामपंचायतीकडे कोणताही अर्ज सादर झालेला नाही.” या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायतीने एजन्सीला लेखी पत्र देऊन ७ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, शेतात साध्या जाळ्या लावून सिलेंडरची साठवणूक केली जात आहे. गॅससारख्या ज्वलनशील पदार्थाची अशा प्रकारे असुरक्षित साठवणूक करणे म्हणजे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देण्यासारखे आहे. “उद्या जर येथे स्फोट झाला किंवा काही दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
या बेकायदेशीर गोडाऊनवर तातडीने कारवाई करून ते बंद करावे आणि दोषींवर कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता प्रशासन या ‘ज्वलंत’ प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
