उरण | अनंत नारंगीकर
जेएनपीए प्रशासनाने चौथ्या बंदरातील वाहतूक आणि आयात-निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी उभारलेल्या उड्डाणपुलाचा मार्ग खचल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २) घडली. राष्ट्रीय महामार्ग ४बी आणि राज्य मार्ग ५४ यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या घटनेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासनाने रात्रोरात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे.

जसखार गावाला वळसा घालून थेट चौथ्या बंदरात जाण्यासाठी हा भव्य पूल उभारण्यात आला आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होऊन काही काळ लोटत नाही तोच पुलाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनाची या घटनेनंतर धावपळ उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. सध्या खचलेल्या ठिकाणी भरावाचे आणि दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
ग्रामस्थांचा संताप आणि सुरक्षेचा प्रश्न
या पुलाच्या बांधकामाला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विरोध होता. काम सुरू असताना जसखारचे ग्रामदैवत श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिराला तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. आता रस्ता खचल्यामुळे स्थानिकांचा संताप अनावर झाला आहे. चार वर्षांपूर्वी जासई येथे उड्डाणपुलाचा पिल्लर कोसळून झालेल्या कामगारांच्या मृत्यूच्या भीषण घटनेची आठवण या निमित्ताने ताजी झाली आहे.
जत्रोत्सवाच्या तोंडावर धोका वाढला
काही दिवसांवरच रत्नेश्वरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत आहे. या काळात मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. तसेच पुलालगत असलेल्या उद्यानामुळे पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या भागात निकृष्ट कामामुळे मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
प्रशासनाने सध्या रातोरात दुरुस्ती करून दोष लपवण्याचा प्रयत्न केला असला, तरी नागरिकांनी या कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला आहे. भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या परिसरातील सर्व पुलांचे आणि रस्त्यांचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणी उरणमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून केली जात आहे.
