खाडी लगतची १,५०० हेक्टर शेती धोक्यात; शासनाने मोफत बियाणे द्यावे, शेतकरी काशिनाथ पाटील यांची मागणी
कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्याकडून पाहणी
विनायक पाटील
पेण : मागील तीन ते चार दिवसांपासून रायगड जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील भातशेतीला बसला आहे. तालुक्यातील खाडी लगतची शेकडो हेक्टर भातशेती मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली असून, आणखी दोन-तीन दिवस सलग पाऊस पडल्यास बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुक्याचे कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी या पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थिती चिंताजनक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पेण तालुक्यात दरवर्षी जवळपास १० हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. यामधील खारेपाट आणि खाडी लगत असणारी जवळपास १,२०० ते १,५०० हेक्टर भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी पाहणीदरम्यान दिली. तालुक्यातील पूर्व भागात आणि खाडी लगत नसलेल्या भागात सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असली, तरी खाडी लगतच्या क्षेत्राला मात्र मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून साचलेले पाणी आणखी दोन-तीन दिवस असेच राहिले आणि पाण्याचा निचरा झाला नाही, तर पाण्याखाली गेलेली भाताची रोपे कुजून जातील आणि शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागेल, अशी भीती कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी शेतकरी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पेरण्या उरकतात. मात्र, यावर्षी शासनाच्या हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा केल्या. आधीच ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकत आणलेले बियाणे पाऊस लांबल्यामुळे पाखरांनी खाऊन टाकले आणि आता जे काही उगवले होते, ते मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे निसर्गाच्या दुहेरी फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाला वाचवण्यासाठी शासनाने दुबार पेरणीसाठी तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त हाक स्थानिक शेतकरी काशिनाथ पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.
