• Sat. Jul 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अतिवृष्टीचा तडाखा : भरणे घाटातील महामार्गाला तलावाचे स्वरूप

ByEditor

Jul 4, 2026

अनिकेत मोहित
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट–N753F महामार्गावरील भरणे घाटाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगराचा काही भाग खचून मोठ्या प्रमाणात माती आणि लहान-मोठे दगड थेट रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून वाहनचालकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम करताना संबंधित यंत्रणेने कमालीचा हलगर्जीपणा केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या गटारांचे किंवा जलनिस्सारण व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी, डोंगरातून वाहून येणारे पाणी थेट रस्त्यावरच साचत असून, महामार्गाच्या बहुतांश भागाला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खाली नेमके कुठे दगड, माती किंवा खड्डे आहेत, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाहीये. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे चालक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात समोरचे काहीच दिसत नसल्याने, या घाटात कधीही मोठा अपघात घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दिघी पोर्ट महामार्ग असल्याने या मार्गावरून अहोरात्र अवजड वाहनांची आणि प्रवाशांची मोठी वाहतूक सुरू असते. ही वाहतूक लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील माती व दगड हटवून पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, तसेच वाहतूक पूर्ववत सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

घाटातील परिस्थिती पाहता येथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करत संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!