• Fri. Jul 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

ByEditor

Jul 3, 2026

​नागोठणे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे ॲक्शन मोडमध्ये; ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महेंद्र म्हात्रे
नागोठणे :
नागोठणे पोलीस ठाण्याचे नवनवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी पदभार स्वीकारताच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली आहे. मिरानगर पाठीमागील जंगल भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा नागोठणे पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह एका गाईची सुटका केली आहे.

​जंगलात सुरू होती कत्तल

​मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०२ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी १७:५० वाजण्याच्या सुमारास मौजे मिरानगर येथील पाठीमागील जंगल भागात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल केली जात होती. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ५, ९ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांची धाडसी कारवाई व मुद्देमाल जप्त

​रायगडच्या पोलीस अधीक्षक मा.श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री. अभिजीत शिवथरे आणि रोहा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही धडक कारवाई केली.

​या कारवाई दरम्यान २ गोवंश प्राण्यांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तांबडी-पांढरी रंगाची लांब शिंगे असलेल्या १ गाईची सुखरूप सुटका केली आहे. या घटनेत पोलिसांनी एकूण ३०,६६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​आरोपींचा गुन्हेगारी इतिहास

​या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कडक पावले उचलली असून, ताब्यात घेतलेल्या आरोपींवर इतर पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल झालेले आहेत. मुझफ्फर इकबाल पानसरे याच्याविरुद्ध आधीच पाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८९/२०२४ नुसार गोवंश कत्तल व प्राणी संरक्षणाशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल आहेत. नवाब मोहम्मद शेख याच्याविरुद्ध यापूर्वी नागोठणे पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७६/२०२१ आणि गु.र.नं. ०८/२०२२ अंतर्गत प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत तर समीर आयुब शेख याच्याविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२/२०२४ नुसार आय.टी. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

​कारवाई करणारे पोलीस पथक

​या धडाकेबाज मोहिमेत सपोनि रवींद्र पारखे यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर, स.फौजदार कृष्णा म्हात्रे, पोहवा/८५२ अथर्व पाटील, पोहवा/८६९ चंद्रशेखर नागावकर, वाहतूक शाखेचे पोहवा/२३१६ मनोहर तुळसीराम माळी, पोशि/१०७१ स्वप्निल भालेराव, पोशि/९२६ बळी पुटेवाड, पोशि/५१७ विक्रांत बांधणकर आणि पोशि/७३४ शिवदास धुळगंडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

​सपोनि रवींद्र पारखे यांनी पदभार घेताच केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!