३१ गावे आणि ७० वाड्या टंचाईच्या छायेत; केवळ ७ टँकरवर तहान भागवण्याची कसरत
महाड | मिलिंद माने
तालुक्यात दरवर्षी सरासरी ३००० मिलीमीटर पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो आणि ‘जलजीवन’ सारख्या कोट्यवधींच्या योजना कागदावर मिरवल्या जातात. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाड तालुक्यात भीषण वास्तव समोर आले आहे. अनियोजित कामे आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे आज ३१ गावे आणि ७० वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, केवळ ७ टँकरद्वारे या भागांची तहान भागवली जात आहे.
करोडो खर्चूनही टँकरमुक्त महाड स्वप्नच
गेल्या ३० वर्षांपासून कृषी, वन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागामार्फत पाणी प्रकल्पांवर प्रचंड निधी खर्च करण्यात आला. मात्र, योजना राबवताना भौगोलिक स्थितीचा विचार न केल्याने या योजना कुचकामी ठरत आहेत. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत १५९ योजना मंजूर असूनही प्रत्यक्षात केवळ ५२ गावांत कामे पूर्ण झाली आहेत, तर १०७ योजना अद्यापही अपूर्ण अवस्थेत लटकल्या आहेत.
तापमानाचा पारा वाढला; जलस्त्रोत आटले
यंदा महाडमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. तीव्र उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून एप्रिलमध्येच नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. ज्या विहिरी मे अखेरपर्यंत भरलेल्या असायच्या, त्या आता कोरड्या पडल्या आहेत. यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या वाढण्याची भीती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
अपूर्ण धरणांचा ‘काळ’ सोसेना
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प तांत्रिक अडचणींच्या गर्तेत अडकले आहेत.
- काळ जलविद्युत प्रकल्प: हा प्रकल्प पूर्ण झाल्यास किल्ले रायगड परिसरासह बिरवाडी आणि महाडपर्यंतचा भाग सुजलाम्-सुफलाम् होऊ शकतो.
- इतर प्रकल्प: कोल कोथेरी धरण, आंबिवली धरण, पारमाची बंधारा यांची कामेही संथगतीने सुरू आहेत. या धरणांची घळभरणी वेळेत झाल्यास पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होईल, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हे प्रकल्प रखडले आहेत.
बेकायदेशीर बोअरवेलचा सपाटा; भूजल पातळी घटली
एकीकडे सरकारी योजना अपयशी ठरत असताना, दुसरीकडे विनापरवाना विंधन विहिरी (बोअरवेल) खोदण्याचे पेव फुटले आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी सारख्या गावांत तर घराघरांत बोअरवेल खोदून पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. महाड शहरातही प्रत्येक इमारतीत भूगर्भातील पाण्याचा उपसा सुरू आहे. मात्र, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (Water Recharging) केले जात नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.
प्रशासकीय वास्तव: पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. अपूर्ण योजना आणि आटत चाललेले जलस्त्रोत यामुळे महाडमधील पाणीटंचाई आगामी काळात अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
