• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग बेतला जीवावर; आरोपीला जन्मठेप

ByEditor

May 8, 2026

पनवेल सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; जखमी पत्नीच्या त्या ‘एका चिठ्ठी’मुळे आरोपीला बेड्या

रायगड । अमुलकुमार जैन
उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून एका वृद्धाचा निर्घृण खून करून, त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करत दागिने व रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. उगले साहेब यांनी ७ मे २०२६ रोजी हा सनसनाटी निकाल दिला. आरोपी संदीप गुप्ता (रा. उल्वे) याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३९४ आणि ३९७ (चोरी व गंभीर दुखापत) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप, प्रत्येकी सात वर्षांचा दोन वेळा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मयत रामप्रसाद गुप्ता आणि त्यांची पत्नी लक्ष्मीदेवी हे उल्वे येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. आरोपी संदीप गुप्ता हा रामप्रसाद यांचा मुलगा सतीश याचा मेव्हणा होता. संदीपने रामप्रसाद यांच्याकडून ७० हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम वारंवार परत मागितल्याचा राग मनात धरून संदीपने चोरी आणि खुनाचा थरारक कट रचला. २२ एप्रिल २०२४ रोजी संदीपने रामप्रसाद यांच्या घरी जाऊन संधी साधली. लक्ष्मीदेवी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता, आरोपीने रामप्रसाद यांना बेडरूममध्ये नेऊन चाकूने वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर बेडरूममध्ये आलेल्या लक्ष्मीदेवींच्या गळ्यावरही वार करून त्यांना बाथरूममध्ये आपटले.

घरातील नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड घेऊन आरोपीने पलायन केले. मात्र, गंभीर जखमी असतानाही लक्ष्मीदेवी यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला. त्यांनी इमारतीखाली येऊन एका साक्षीदारासमोर इंग्रजी वर्तमानपत्रावर “सतीश के साले ने मेरे पति को मारा” असे लिहून आरोपीची ओळख पटवून दिली. तातडीच्या उपचारामुळे लक्ष्मीदेवी यांचे प्राण वाचले आणि न्यायालयात त्यांची साक्ष या खटल्यात अत्यंत कळीची ठरली.

एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक स्मिता जाधव यांनी केला. सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. दोन वर्षांच्या सुनावणीत एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासोबतच, जप्त केलेले दागिने आणि रोकड लक्ष्मीदेवी यांना परत करण्याचे आदेश दिले. या कारवाईत पोलीस वाघचौरे, पोलीस गिरासे व तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. वृद्ध आणि एकाकी नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला या निकालामुळे जरब बसली असून, सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!