नगरपालिकेकडून शहराचे सुशोभीकरण; ‘फुलांचे शहर’ बनवण्यासाठी प्रशासनाची धावपळ
धाटाव | शशिकांत मोरे
रोहे शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार उद्या, ११ मे रोजी रोहा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या पहिल्याच अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने रोहा नगरपालिकेने शहराचा कायापालट करण्यासाठी कंबर कसली असून, संपूर्ण शहर फुलांनी सजवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी अनेकदा रोह्याला भेट दिली, मात्र त्यावेळी शहराचे असे सुशोभीकरण झाले नव्हते. आता सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच रोह्यात येत असल्याने, त्यांना शहरात थोडाफार का होईना ‘बारामती लूक’ दिसावा, या हेतूने मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा शोभिवंत फुलांची झाडे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहराला ‘फुलांचे शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा नगरपालिकेचा हा प्रयत्न चर्चेचा विषय ठरत आहे.
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळाली आहे. विशेषतः कुंडलिका नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होता. ज्येष्ठ पत्रकार आणि संघर्ष समितीचे दिलीप वडके यांनी या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्याची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी नदी संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि सत्ताधाऱ्यांवर अशा सामाजिक चळवळीतील व्यक्तींचा अंकुश असल्यानेच विकासाची चाके फिरत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पाहुण्यांच्या स्वागतासाठी घाईघाईने लावण्यात येणारी ही झाडे केवळ प्रदर्शनापुरती न राहता, ती भविष्यात जगवण्याची जबाबदारी नगरपालिकेने प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी अपेक्षा सामान्य रोहेकरांकडून व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षा वनश्री शेडगे या स्वतः विकासकामांवर लक्ष ठेवून असल्याने, त्या या ‘फुलांच्या शहराचे’ स्वप्न नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
