• Mon. Aug 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे ताब्यात

ByEditor

Aug 10, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी स्टँड परिसरात टाकलेल्या छाप्यात वाहनासह एकूण १ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एसटी स्टँड परिसरात सापळा रचला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या डिकीमध्ये गुटखा, तंबाखू आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा लपवून ठेवून गुप्तपणे विक्री केली जात असल्याचा उलगडा या कारवाईदरम्यान झाला.

दोन संशयितांवर गुन्हा दाखल

या बेकायदेशीर विक्री प्रकरणी मेहेरबानो समीर टोळेकर आणि सचिन सहदेव रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचे सुगंधित पानमसाले, तंबाखू, सुगंधित तंबाखूची पाकिटे आणि इतर बंदी घातलेली तंबाखूजन्य उत्पादने पोलिसांनी जप्त केली आहेत.

ही धडक कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA, २००३) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे. वाहनाच्या डिकीचा चलाखीने वापर करून चालणाऱ्या या गुटखा विक्रीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भविष्यातही अशा बेकायदेशीर विक्रीविरोधात अधिक तीव्र कारवाया सुरूच राहतील, असा कडक इशारा श्रीवर्धन पोलिसांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!