डॉ. सतेज म्हसकर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या बालकाला नवजीवन!
कोलाड । विश्वास निकम
खेळण्यातील दोन लहान चुंबक गिळल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या आतड्यांना गंभीर छिद्रे पडून त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटाचा किरकोळ संसर्ग वाटणारा हा प्रकार अत्यंत जीवघेणा ठरला असता; मात्र सर्जन डॉ. सतेज शंकरराव म्हसकर यांनी वेळेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. आठवडाभराच्या उपचारानंतर बालकाला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गॅस्ट्रोच्या संशयापासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचा थरार
संबंधित बालकाला सुरुवातीला अधूनमधून पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे सुरुवातीला सामान्य ‘गॅस्ट्रोएन्टेरायटिस’चा (पोटाचा संसर्ग) संशय व्यक्त केला जात होता. मात्र, वेदना अधिक तीव्र झाल्यानंतर करण्यात आलेल्या अल्ट्रासाऊंड तपासणीत अपेंडिसायटिसची लक्षणे दिसल्याने बालकाला तातडीने ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये हलवण्यात आले.
शस्त्रक्रियेदरम्यान पोटात मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य द्रव साचल्याचे निदर्शनास आले. हा द्रव बाहेर काढत असताना अचानक दोन लहान चुंबक मेटल सक्शन कॅथेटरला (वैद्यकीय उपकरणाला) जाऊन चिकटले. तेव्हा बालकाने हे चुंबक वेगवेगळ्या वेळी गिळल्याची खरी हकीकत समोर आली.
आतड्यांवर दाब पडल्याने दोन ठिकाणी छिद्रे
हे दोन्ही चुंबक आतड्याच्या वेगवेगळ्या भागात असल्याने ते आतड्यांमधूनच एकमेकांकडे प्रचंड ताकदीने आकर्षित झाले. या दाबामुळे आतड्याच्या भिंतीवर प्रचंड ताण येऊन दोन ठिकाणी छिद्रे पडली होती—यातील एक छिद्र लहान आतड्यात, तर दुसरे मोठ्या आतड्याच्या ‘सीकम’ या भागात पडले होते. डॉ. सतेज म्हसकर यांच्या पथकाने ही दोन्ही छिद्रे शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या बुजवून बालकाच्या पोटातील दूषित भाग पूर्णपणे स्वच्छ केला.
घरी तपास केला असता, बालकाच्या पालकांना चुंबक असलेले एक तुटलेले खेळणे सापडले. हे चुंबक ‘निओडिमियम’ या अत्यंत शक्तिशाली धातूपासून बनलेले होते. या धातूच्या चुंबकाची शक्ती सामान्य चुंबकापेक्षा ५ ते ३० पटीने अधिक असते.
पालकांनो सावधान! – डॉ. सतेज म्हसकर यांचे आवाहन
“लहान मुलांच्या अनेक प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये हे शक्तिशाली चुंबक वापरलेले असतात. खेळणी तुटल्यास हे छोटे चुंबक सहज बाहेर येतात आणि लहान मुले ते तोंडात टाकण्याचा धोका असतो. त्यामुळे पालकांनी मुलांना अशा चुंबकीय खेळण्यांपासून दूर ठेवावे आणि मुलांना खेळायला देण्यापूर्वी खेळणी सुरक्षित आहेत की नाही, याची खात्री करावी.”
— डॉ. सतेज शंकरराव म्हसकर (सर्जन)
