• Mon. Aug 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वर्ष उलटले तरी भरपाईची प्रतीक्षा; श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी हवालदिल

ByEditor

Aug 10, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही पूर्ण झाले; मात्र तब्बल वर्ष उलटून गेले तरी अनेक बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. शासनाच्या या उदासीन कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असून, श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरीवर्गात प्रचंड असंतोष पसरला आहे.

“नुकसान आमचे झाले, प्रशासनाने पंचनामेही केले; मग नुकसानभरपाईची रक्कम खात्यात कधी जमा होणार?” असा संतप्त सवाल आता हवालदिल झालेले शेतकरी विचारत आहेत.

विविध तांत्रिक कारणांमुळे मदत रखडल्याची चर्चा

गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन परिसरातील भात शेती, फळबागा, भाजीपाला आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने सुपीक माती वाहून गेली आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

काही मोजक्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली असली, तरी मोठ्या प्रमाणावर अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. कागदपत्रांमधील त्रुटी, मंजुरी प्रक्रियेतील दप्तरदीरंगाई, निधीची चणचण आणि बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी यांमुळे ही मदत रखडल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

नवीन हंगाम सुरू, पण मागील भरपाईचा पत्ता नाही!

सध्या पावसाळ्याचा नवा हंगाम सुरू झाला असून, शेतीच्या कामांसाठी पुन्हा मोठ्या भांडवलाची गरज निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या वर्षाचीच हक्काची भरपाई अजून न मिळाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

प्रशासनाने तातडीने प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट नुकसानभरपाईची रक्कम जमा करावी, अशी जोरदार मागणी श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!