उरण । अनंत नारंगीकर
पावसाळी मासेमारीवर बंदी असतानाही उरण परिसरात अवैध मासेमारीचे सत्र सुरूच असून, यादरम्यान आवरे गावातील एक खलाशी समुद्रात बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संगम भार्गव गावंड (वय ६२) असे बेपत्ता खलाशाचे नाव असून, त्यांच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने उरण तालुक्यातील अवैध मासेमारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २ ऑगस्ट रोजी संगम गावंड हे ‘महालक्ष्मी’ नावाच्या बोटीवर मासेमारीसाठी गेले होते. तेव्हापासून त्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यानंतर रविवारी (९ ऑगस्ट) गावंड बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
माहिती लपवल्याने संशय बळावला
१२ नॉटिकल मैलांपेक्षा लांब मासेमारीसाठी केंद्र शासनाचा परवाना (पास) असणे आवश्यक असतानाही ‘महालक्ष्मी’ बोट कोणतीही परवानगी न घेता खोल समुद्रात गेली होती. मासेमारी करून झाल्यानंतर ही नौका वशेणी खाडीत नांगरण्यात आली. मात्र, संगम गावंड बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना तातडीने न देता बोटीतील मासळी विकल्यानंतर देण्यात आली.
याशिवाय बोटीवरील नाखवा आणि खलाशी या प्रकरणी परस्परविरोधी उत्तरे देत आहेत. “कोणी संगम खाडीत पडल्याचे सांगते, तर कोणी तो वशेणी येथून घरी जाण्यास निघाल्याचे सांगते.” या संदिग्ध उत्तरांमुळे संगम यांच्या कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला आहे.
मत्स्य विभाग आणि नाखवांचे साटेलोटे?
उरण तालुक्यात बंदीकाळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी सुरू असते. मत्स्य व्यवसाय विभाग आणि बोटींचे नाखवा यांच्यातील साटेलोट्यामुळेच हा अवैध व्यवसाय फोफावला असल्याचा आरोप होत आहे. ‘महालक्ष्मी’ बोट ससून डॉक येथे नोंदणीकृत असून, ती करंजा येथील एका नाखवाने भागीदारीवर चालवण्यास घेतली होती. केंद्राचा पास नसतानाही वशेणी बंदरात मासळी उतरवून विक्री करेपर्यंत खलाशी बेपत्ता असल्याची बातमी दडपण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणात काहीतरी ‘काळेबेरे’ असल्याचा आरोप केला जात आहे.
“आमचे वडील बेपत्ता झाल्याची माहिती जाणूनबुजून आमच्यापासून लपवण्यात आली. बोटीवरील खलाशीसुद्धा वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. आम्ही वशेणी खाडीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र काहीही हाती लागले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे.” — समीर गावंड (बेपत्ता खलाशाचा मुलगा)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उरण पोलिसांनी या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद केली असली, तरी कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे पोलीस या प्रकरणाचा घातपाताच्या कोनातून तपास करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
