• Tue. Aug 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये शेकडो कामगार, महिला, शेतकऱ्यांचा रोष; ‘मोदी सरकार चले जाव’च्या घोषणा देत तहसीलदार कचेरीवर विराट मोर्चा

ByEditor

Aug 10, 2026

उरण । अनंत नारंगीकर
कामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, वाढती महागाई कमी करा आणि विरार-अलिबाग कॉरिडोअर बाधितांना योग्य मोबदला द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज उरणमध्ये कामगार, महिला, शेतकरी आणि युवकांचा आक्रोश पाहायला मिळाला. सीआयटीयू, किसान सभा, जनवादी महिला संघटना व डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा विराट मोर्चा ‘मोदी सरकार चले जाव’च्या जोरदार घोषणा देत चार फाटा येथून उरण तहसीलदार कचेरीवर धडकला.

संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना कृती समितीने आज देशभरात पुकारलेल्या आंदोलनाच्या हाकेला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोर्चात शेकडो बांधकाम कामगार, महिला, शेतकरी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कचेरीवर पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार नरेश पेडवी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या निवेदनाद्वारे कोकण आयुक्त आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थानिक, राज्यव्यापी व देशव्यापी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहिता रद्द करून कामगारांना संरक्षण देणारे जुने कायदे लागू करण्याची आणि कामगार-कर्मचाऱ्यांना दरमहा ३० हजार रुपये वेतन देण्याची मागणी करण्यात आली. तसेच बांधकाम कामगारांच्या बंद केलेल्या २० योजना पूर्ववत सुरू कराव्यात, विस्तारीत गावठाणासह गावांची मोजणी करून प्रत्येक घराला सनद म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड द्यावे, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, बांधबंदिस्तीची दुरुस्ती करून शेती व गावांचे संरक्षण करावे आणि मच्छीमारांचे डिझेल परतावे वेळेवर द्यावेत अशा विविध मागण्या लावून धरण्यात आल्या.

याशिवाय पुढील पाच वर्षांत कोणत्याही शिक्षण व्यवस्थेत फी वाढ करू नये, पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे, प्रत्येक तालुक्यातील व जिल्ह्यातील नोकरभरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळावे, स्त्रियांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देऊन त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शासन करावे, रेशनिंगमधील काळाबाजार बंद करून महागाई कमी करावी, विरार-अलिबाग कॉरिडोअर बाधित शेतकऱ्यांना प्रती गुंठा ५० लाख रुपये भाव द्यावा, एमएमआरडीए प्रकल्प रद्द करावा, स्मार्ट वीज मीटर लावू नयेत तसेच आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करून खड्डेमुक्त रस्ते निर्माण करावेत, अशा सर्वसमावेशक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

तहसीलदार कचेरीसमोर झालेल्या सभेत हेमलता पाटील, कुसुम ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे आणि किरण केणी यांनी समयोचित भाषणे केली. वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनता विरोधी धोरणांवर कडाडून टीका करत, जर या रास्त मागण्यांची तात्काळ दखल घेतली गेली नाही तर येत्या काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!