• Mon. Aug 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

४० वर्षांचा संयम संपला! पुनर्वसनाच्या जमिनीसाठी नवीनशेवा व हनुमान कोळीवाडा एकत्र; १५ ऑगस्टपासून JNPA समोर बेमुदत धरणे आंदोलन

ByEditor

Aug 10, 2026

उरण । घन:श्याम कडू
गेल्या चार दशकांपासून केवळ आश्वासनांवर बोळवण करून पुनर्वसनाच्या नावाखाली गावकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता नवीनशेवा आणि हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांनी एल्गार पुकारला आहे. “आता कागदावरचा हक्क नको, प्रत्यक्ष जमीन हवी!” या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्टपासून ‘जेएनपीए’ (JNPA) प्रशासन भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार दोन्ही गावांनी संयुक्तपणे केला आहे.

जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनी गमावून विस्थापित झालेल्या या गावकऱ्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. रविवारी नवीनशेवा येथील शांतेश्वरी देवी मंदिरात पार पडलेल्या संयुक्त ग्रामसभेत दोन्ही गावांचा संताप उफाळून आला. या वेळी नागरिकांनी सभागृह खचाखच भरले होते. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची!’ आणि ‘अरे कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय!’ अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

अपूर्ण पुनर्वसनामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीए बंदरासाठी विस्थापित झालेल्या नवीनशेवा गावाला पुनर्वसनाच्या निकषानुसार किमान ३३ हेक्टर जमीन मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १० हेक्टर जागेवरच पुनर्वसन करण्यात आले. तसेच, शेवा कोळीवाडा (सध्याचा हनुमान कोळीवाडा) या गावाला १० हेक्टर ऐवजी अवघ्या अडीच हेक्टर जागेवर बोळवण करण्यात आली.

ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना हक्काच्या पुनर्वसनापासून वंचित ठेवायचे आणि त्याच जमिनींवर इतरांना कोट्यवधींच्या उलाढालीची दारे उघडायची, हा कोणता न्याय? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

“दोन्ही गावांची एकजूटच हक्क मिळवून देणार” – माजी आमदार मनोहरशेठ भोईर

सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रशासनावर सडकून टीका केली.

“आपली हक्काची जमीन जेएनपीए दुसऱ्यांना भाड्याने देऊन कोट्यवधी रुपये कमावते, मग विस्थापितांना त्यांच्या हक्काची जमीन देताना अडचण काय? कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू अतिशय भक्कम आहे. हनुमान कोळीवाडा आता एकटा नसून त्याचा मोठा भाऊ नवीनशेवा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या एकजुटीमुळे हा लढा नक्कीच यशस्वी होईल.” — मनोहरशेठ भोईर, माजी आमदार

या बैठकीस पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, सरपंच सोनलताई घरत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, पंडितशेठ घरत, चंद्रकांत घरत, नारायण सुतार, आरती कोळी, माजी सरपंच सुरेश कोळी, नितीन कोळी यांच्यासह दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून विस्थापितांच्या संघर्षाचा नवा अध्याय ठरेल, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत आंदोलनाकडे आता संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!