रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात धुमाकूळ घालणारा लोकेश सुतार पोलिसांच्या जाळ्यात
साथीदाराची पोलिसांच्या गाडीला धडक देऊन पळण्याची धडपड
नागोठणे (विशेष प्रतिनिधी)
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने कारवाई करत आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला अटक केली आहे. लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांत घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल ६८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे एलसीबीची धडक कारवाई
नागोठणे पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२६ रोजी BNS कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरज पाटील, पोलीस अंमलदार विनोद पाटील, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, शामराव कराडे, अक्षय पाटील व तुषार घरत यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवत आरोपी लोकेश सुतार याला शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीस पुढील कारवाईसाठी नागोठणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी हा सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ‘पाहिजे’ (वान्टेड) आरोपी म्हणून नोंद होता.
तीन राज्यांत गुन्हेगारीचे जाळे; ६८ गुन्ह्यांचा पूर्वइतिहास
तपासादरम्यान आरोपी लोकेश सुतारचा भीषण गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. त्याच्यावर कर्नाटकच्या बागलकोट, बेळगाव, विजयपुरा; गोव्यातील ओल्ड गोवा; तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, नागपूर, अकोला, धुळे, रत्नागिरी आणि रायगड (पेण व नागोठणे) पोलीस ठाण्यांत ६८ गुन्हे नोंद आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), आर्म्स ॲक्ट आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
तपास पथकाच्या वाहनाला धडक देऊन पळणारा दुसरा आरोपी चाकण पोलिसांकडून अटकेत; ‘थार’ जप्त
याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुखदेव हनुमंत नाईक (वय २६, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) याने तपास पथकाच्या वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस हद्दीत नाकाबंदीदरम्यान आरोपीने शासकीय वाहनांचे मोठे नुकसान केले. एवढेच नव्हे तर नाकाबंदीवर तैनात असलेले पोलीस अंमलदार निरोझ रझाक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दावडी/दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात आरोपी सुखदेव नाईकविरुद्ध BNS कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची ‘थार’ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
