घनःश्याम कडू
उरण : ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पाच्या नावाखाली उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांतील जमिनी हडपून स्थानिक भूमिपुत्रांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात ‘एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगड’च्या नेतृत्वाखाली येत्या १५ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील कोकण आयुक्त कार्यालयावर (कोकण भवन) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे.
“तिसऱ्या मुंबईला एक इंचही जमीन देणार नाही!” असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. आपली शेती, घरे, गावे, भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार विरोधी समितीने व्यक्त केला आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऐतिहासिक चिरनेर हायस्कूल येथे हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात होईल. अभिवादनानंतर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शेतकरी बेलापूरच्या दिशेने कूच करतील. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोकण भवनासमोर शांततापूर्ण मार्गाने लाक्षणिक उपोषण केले जाईल.
आपलं भविष्य, आपली शेती; आपलं घर आणि गाव वाचवण्यासाठी तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर व सरचिटणीस रूपेश पाटील यांनी केले आहे.
