• Sat. Aug 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भूमिपुत्र संघटनेचा गालसुरे हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रम; श्रीवर्धन तालुक्यात कौतुक

ByEditor

Aug 8, 2026

श्रीवर्धन | अनिकेत मोहीत
पर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि वृक्षांचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावे, या उद्देशाने भूमिपुत्र संघटना – श्रीवर्धन यांच्या वतीने गालसुरे हायस्कूल, गालसुरे येथे शालेय विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप करण्यात आले. शाळेची एकूण पटसंख्या ११४ असून, प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमागे एक झाड याप्रमाणे ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या झाडाची कुंडीमध्ये लागवड करून संपूर्ण शैक्षणिक वर्षभर त्याचे संगोपन व देखभाल करायची आहे. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात ही झाडे पुन्हा संघटनेकडे जमा केली जाणार असून, त्यांची डोंगरावर लागवड करण्यात येईल. तसेच, झाडांची योग्य काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोबदला दिला जाणार असून, त्या निधीतून पुढील वर्षी शाळा किंवा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपक्रम राबवले जातील, असे संघटनेने स्पष्ट केले.

​या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना झाड लावणे, त्याचे संगोपन करणे आणि श्रमाचे मूल्य याची प्रत्यक्ष जाणीव होणार असून, पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन पर्यावरण शिक्षणाचा अनुभव कृतीत उतरणार आहे. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका जामकर, स्मिता महाजन, दीपिका आरेकर, सीमा वाघपंजे, शोभा तांबे, सोमनाथ कराड तसेच वनविभाग श्रीवर्धन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी भूमिपुत्र संघटनेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि श्रमाचे मूल्य या तिन्ही गोष्टींची सांगड घालणारा हा उपक्रम श्रीवर्धन तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत असून, अशा प्रकारचे ‘दत्तक झाड’ अभियान इतर शाळांमध्ये आणि गावांमध्येही राबवावे, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!