आंबेवाडी ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघड्यावर; पावसाळ्यापूर्वी साथीच्या आजारांची भीती
धाटाव । शशिकांत मोरे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील गोदी नदीच्या पुलावर चिकनची घाण आणि कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे येथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचा श्वास गुदमरत असून, अक्षरशः नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गोदी नदीच्या पुलाखाली परिसरातील चिकन व्यावसायिक सर्रासपणे कोंबड्यांची घाण आणि टाकाऊ अवशेष नदीपात्रात व पुलाजवळ टाकत आहेत. या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित चिकन विक्रेते कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.
घंटागाड्या असूनही उघड्यावर कचरा!
आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात सकाळी कचरा संकलनासाठी घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असतानाही येथील चिकन व्यावसायिक आपला कचरा घंटागाडीत न देता थेट गोदी नदीच्या पुलाजवळ आणून टाकतात. कचरा व्यवस्थापनाच्या या बोजवाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार मात्र वेशीवर टांगला गेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; ठोस कारवाईची मागणी
याच मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि नागरिक ये-जा करतात. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसामुळे हा कचरा कुजून दुर्गंधीत अधिकच भर पडणार आहे. परिणामी, परिसरात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
परिसर स्वच्छ ठेवणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता या त्रासातून मुक्ततेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासन संबंधित बेजबाबदार चिकन व्यावसायिकांवर कोणती ठोस भूमिका घेणार? याकडे संपूर्ण कोलाड परिसराचे लक्ष लागले आहे.
