• Sat. Jun 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; नेरळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद!

ByEditor

Jun 13, 2026

शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी मुलाला लागली; गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त

कर्जत । गणेश पवार
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे. पोलिसांच्या या अत्यंत तत्पर आणि गतिमान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी हेमंत रामदास सराई हा अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना ही धक्कादायक घटना घडली. परिसरातील जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने काही अज्ञात इसमांनी बंदुकीतून गोळीबार केला होता. दुर्दैवाने या बंदुकीतून सुटलेले छरे थेट खेळणाऱ्या हेमंतला लागले. या गोळीबारात हेमंतच्या दोन्ही मांडींना आणि दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिनीत शिवतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या सूचनेनुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

विशेष पथकाने तांत्रिक तपास, गोपनीय बातमीदार आणि स्थानिक पातळीवर केलेल्या कसून चौकशीच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलिसांनी २४ तासांच्या आत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शिकारीच्या उद्देशाने गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातील बंदूक (हत्यार) हस्तगत केली आहे.

अल्पवयीन मुलावर गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, नेरळ पोलिसांनी केवळ एका दिवसात या गुन्ह्याचा उलगडा केल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बेकायदेशीर शिकार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!