• Sat. Jun 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बाळ्यामामांच्या हस्तक्षेपाने भूमिपुत्रांना दिलासा! सिंगापूर पोर्टमधील माजी सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगाराची संधी; जेएनपीएमधील रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला वेग

ByEditor

Jun 13, 2026

उरण । घनश्याम कडू
खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सिंगापूर पोर्ट (बीएमसीटी) मधून काही वर्षांपूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड सुरक्षा मंडळामार्फत या सुरक्षा रक्षकांना ‘जेएनपीए’ (JNPA) परिसरात पोस्टिंग देण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार ट्रॅफिक वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर उरण सामाजिक संस्थेने १० जून २०२६ रोजी नवी मुंबई वाहतूक विभागाकडे यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या विषयाचा आक्रमक पाठपुरावा केला.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, सिडको आणि जेएनपीए प्रशासनाला २०० हून अधिक ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देण्याबाबत अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

न्यायालयीन आदेशानुसार कार्यवाहीचे आश्वासन

दरम्यान, रायगड सुरक्षा मंडळाने २९ मे २०२६ रोजी जेएनपीए प्रशासनाला सुरक्षा रक्षकांच्या १० रिक्त जागा भरण्याबाबत पत्र दिले होते. यासंदर्भात खासदार सुरेश म्हात्रे यांनी जेएनपीएच्या महाव्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेदरम्यान, न्यायालयीन आदेशानुसार आवश्यक ती सर्व सकारात्मक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

दोघांची नियुक्ती; उर्वरितांसाठी प्रयत्न सुरू

रायगड सुरक्षा मंडळाने सिंगापूर पोर्टमधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांपैकी काही जणांची निवड प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये लखपती परशुराम भोईर (पाणजे, उरण) आणि ज्ञानेश्वर गजानन पाटील (कुंडेगाव, उरण) यांची निवड करण्यात आली असून, ते जेएनपीएमध्ये कामावर रुजूही झाले आहेत.

याशिवाय, उर्वरित पात्र भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांनाही लवकरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी काळात जेएनपीए, सिडको, नैना (NAINA) आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील विविध आस्थापनांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.

भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर झालेल्या सकारात्मक घडामोडींमुळे उरणमधील स्थानिक युवकांमध्ये आणि कामगार वर्गात सध्या समाधानाचे वातावरण आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!