• Wed. Jul 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुसळधार पावसामुळे देवकान्हेनजीक कालव्याला भगदाड; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

ByEditor

Jul 8, 2026

पाटबंधारे विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची बळीराजाची मागणी

विश्वास निकम
कोलाड :
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती जलमय झाली आहे. त्यातच, कुंडलिका नदीवरील डोळवहाल बंधाऱ्यातून बारमाही वाहणाऱ्या ‘उजव्या तीर अष्टमी कालव्याला’ देवकान्हे गावाजवळ मुसळधार पावसामुळे मोठी खांड (भगदाड) पडली आहे. या फुटलेल्या कालव्यातून पुराच्या पाण्यासोबत आलेले दगड, माती आणि गाळ खालील शेतजमिनीत घुसल्याने, शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सज्ज केलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दुहेरी संकटात बळीराजा

यावर्षी पावसाचे आगमन उशिराने झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा केल्या होत्या. पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेतात नांगरणी व चिखलकाम सुरू केले होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने अनेकांची पेरलेली भात पिके वाहून गेली आहेत. देवकान्हे भागात कालव्याला भगदाड पडल्याने कित्येक एकर शेतीत मातीचा ढीग आणि गाळ साचला आहे. ही शेती पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मेहनत व खर्च करावा लागणार आहे, तर काही शेतजमिनी नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू

कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. विभागाचे अधिकारी श्री. कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, ही खांड बुजवण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत करण्यात आली आहे.

तातडीने पंचनामे करून भरपाई द्या!

“यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच कालवा फुटल्याने देवकान्हे परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या पूरग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित शासकीय नुकसान भरपाई द्यावी.”
— किशोर भोईर
(शेतकरी प्रतिनिधी, चिल्हे-देवकान्हे विभागीय शेतकरी संघटना)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!