सचिन मयेकर
रेवदंडा : येथील बायपास रस्त्यालगत असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अंग्रेनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी फिरकले नसल्याचा संतापजनक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
आपत्तीच्या काळात मदत व तक्रारीसाठी ग्रामस्थांनी मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे समोर आले आहे.
कार्यालयात शुकशुकाट; नागरिकांची ससेहोलपट
विविध दाखले, महसूलविषयक कामे आणि अर्ज सादर करण्यासाठी परिसरातील नागरिक दररोज कार्यालयात येत आहेत. मात्र, कार्यालयाला कुलूप असल्याने आणि अर्ज स्वीकारण्यासाठी एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे. आपत्तीच्या काळात प्रशासनाने तत्पर राहणे अपेक्षित असताना, अधिकारी कार्यालयातही नाहीत आणि फोनवरही उपलब्ध नसल्याने “ग्रामस्थांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
फलक लावण्याचेही सौजन्य नाही; ज्येष्ठ नागरिकाची सलग तीन दिवस पायपीट
दरम्यान, संबंधित मंडळ अधिकारी आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या ढिसाळ नियोजनाचा फटका एका ज्येष्ठ नागरिकाला बसला. आपल्या कामासाठी गेल्या तीन दिवसांपासून ते रेवदंडा कार्यालयाच्या फेऱ्या मारत होते. शेवटी संपर्क झाला असता अधिकारी आजारी असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
यावर संताप व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, ”अधिकारी आजारी असल्यामुळे येऊ शकत नसतील, तर किमान कार्यालयाबाहेर तसा सूचना फलक लावणे आवश्यक होते. प्रशासनाला एवढेही सौजन्य नसावे? फलक नसल्यामुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.”
प्रशासनाकडे तातडीची मागणी
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची दाहकता पाहता महसूल प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. रेवदंडा कार्यालयात तातडीने नियमित किंवा पर्यायी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, नागरिकांचे प्रलंबित अर्ज स्वीकारावेत आणि अंग्रेनगर परिसरातील पूरग्रस्त भागाची तात्काळ पंचनामा व पाहणी करून दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता रेवदंडा परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
