मिलिंद माने
महाड: महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांना त्यांच्याच दालनात भाजप नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या मारहाणीत मुख्याधिकारी कोळेकर हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवकासह तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभागातील पाण्याच्या प्रश्नावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आज दुपारी नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील आपल्या दालनात शासकीय कामकाज करत बसले होते. त्यावेळी भाजप नगरसेवक सुरज बामणे हे आपल्या सहकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आले. प्रभागातील पाणी प्रश्नावरून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली. मात्र, या चर्चेचे रूपांतर लवकरच तीव्र वादात झाले.
दालनातच केली बेदम मारहाण आणि धमकी
हा वाद इतका विकोपाला गेला की, नगरसेवक सुरज बामणे, त्यांचे सहकारी राकेश पाटील आणि अन्य एका जणाने मुख्याधिकारी कोळेकर यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राकेश पाटील याने कोळेकर यांना अद्वातद्वा शिवीगाळ करत, “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नगरपालिकेत एकच खळबळ उडाली.
पोलिसात गुन्हा दाखल
घटनेनंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी थेट महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१ (२), २२१, ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत. शासकीय अधिकाऱ्यावर कार्यालयातच झालेल्या या हल्ल्यामुळे महाड राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
