१८ वर्षांनंतरही चौपदरीकरण अपूर्ण; ‘हाच का कोकणचा शाश्वत विकास?’ वाहनचालकांचा संतापलेला सवाल
मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, अवजड वाहने बंद पडणे किंवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी होणे हे चाकरमान्यांसाठी नवीन नाही. सणासुदीच्या काळात, होळी-शिमग्याला किंवा मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये या महामार्गावर तासनतास अडकून पडण्याचा अनुभव प्रवाशांनी अनेकदा घेतला आहे. मात्र, महामार्गाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही वाहतूक कोंडी मानवनिर्मित किंवा वाहनांमुळे झाली नसून, चक्क महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे झाली आहे! नागोठणे परिसराजवळ तब्बल ४४ तासांपेक्षा अधिक काळ महामार्ग पाण्याखाली राहिल्याने पूर्णपणे ठप्प झाला होता. यावरून, “हाच का कोकणचा शुद्ध आणि शाश्वत विकास?” अशी तीव्र आणि उपरोधिक चर्चा आता त्रस्त वाहनचालकांमध्ये रंगू लागली आहे.

जिंदाल कंपनीजवळ भरले ७ ते ८ फूट पाणी!
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील तब्बल १८ वर्षांपासून रखडलेले आहे. काम पूर्ण झालेले नसतानाही खारपाडा येथे टोल नाका सुरू करून वाहनचालकांकडून वसुली सुरू आहे, मात्र महामार्गाची दुरवस्था संपलेली नाही. गेल्या चार दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण, खेड, संगमेश्वर, महाड, नागोठणे आणि रोहा या भागात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पूर आल्यावर हा महामार्ग काही काळासाठी बंद होतो, मात्र यंदा नागोठणे जवळील जिंदाल कंपनीला लागून असलेल्या महामार्गावर तब्बल ७ ते ८ फुटांपर्यंत पाणी साचले होते. परिणामी, हा मुख्य महामार्ग ४४ तासांहून अधिक काळ पूर्णपणे बंद राहिला. महामार्गावरच पाणी साठल्याने शेकडो वाहने जागच्या जागी अडकून पडली होती.
रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का? जनतेचा संतप्त सवाल
या गंभीर परिस्थितीमुळे अडकून पडलेल्या आणि हाल सोसणाऱ्या वाहनचालकांनी आता थेट सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले आहे. रायगड जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे तसेच पेणचे भाजपा आमदार रवींद्र पाटील यांच्या कार्यक्षेत्रात येतो. याशिवाय, रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी आणि विधान परिषदेचे सदस्य हे बहुतांश सत्ताधारी पक्षाचेच आहेत.
महाडचे आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे नेते भरत गोगावले, तसेच श्रीवर्धनच्या आमदार व मंत्री आदिती तटकरे हे सर्वजण याच महामार्गावरून सातत्याने ये-जा करत असतात. तरीही नागोठणे येथील महामार्गावर ७ ते ८ फूट पाणी साचून रस्ता ४४ तास बंद राहिल्याच्या या धक्कादायक घटनेबाबत एकाही सत्ताधारी लोकप्रतिनिधीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला (NHAI) जाब का विचारला नाही? असा संतप्त सवाल वाहतूक कोंडीत अडकलेल्या त्रस्त प्रवाशांनी व वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. १८ वर्षांनंतरही पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची साधी व्यवस्था महामार्गावर नसेल, तर यालाच ‘शाश्वत विकास’ म्हणायचे का, असा सवाल आता विचारला जात आहे.
