अलिबाग-रोहा मार्गावरील अपघात: माहिती असूनही रस्त्यावरील बगदाड न बुजविल्याने शेतकऱ्याचा गेला बळी; अपघातापूर्वी दिली होती लेखी पूर्वसूचना
अलिबाग: सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबागचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील मौजे वेलवली-खानाव हद्दीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. चांगू कमळू घरत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमत व कर्तव्यातील कसूरपणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०५ आणि १०६ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
धोका माहीत असूनही दुर्लक्ष
अलिबाग-रोहा रस्त्यावरील वेलवली-खानाव गावालगत रस्त्यावर एक मोठे बगदाड (खड्डा) पडले होते. या बगदाडामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवणारी लेखी तक्रार अॅड. राकेश पाटील यांनी अपघातापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. याशिवाय, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनीही घटनेच्या दोन दिवस आधी रेवदंडा पोलिस निरीक्षकांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इशारा फलक लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या याच बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे शेतकरी चांगू कमळू घरत यांना आपला जीव गमावावा लागला. ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे काम आणि अधिकाऱ्यांनी कर्तव्यात केलेला कसूर यासाठी पूर्णपणे कारणीभूत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अॅड. पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्याकडे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“रस्त्यावरील त्या मोठ्या बगदाडामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, अशी लेखी पूर्वसूचना मी दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिली होती. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या जिवापेक्षा ठेकेदारांचे हित जपणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला. या निष्काळजीपणाची किंमत मयत चांगू घरत आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोजावी लागली आहे. आता पोलिस यावर काय आणि कसा तपास करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
— अॅड. राकेश नारायण पाटील (तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते)
