लाभांशामध्ये १२.५ टक्क्यांची घसघशीत वाढ; ‘कृषीमित्र’ योजनेची घोषणा आणि शून्याची एनपीए राखत ९३ कोटींचा नफा
सचिन पावशे
अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८,१७५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून, आगामी काळात १०,००० कोटींचा व्यवसाय आणि १,००० कोटींचा स्वनिधी गाठण्याचा संकल्प बँकेने सोडला आहे. बँकेच्या या नेत्रदीपक प्रगतीचा आनंद सभासदांसोबत वाटून घेताना चालू वर्षासाठी १२.५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. बँकेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयात ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर बँकेचे सर्व संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मंदार वर्तक प्रामुख्याने उपस्थित होते.
आधुनिक शेतीसाठी ७ टक्के दराने कर्ज; ‘कृषीमित्र’ योजना सुरू
अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून आधुनिक आणि व्यावसायिक शेतीकडे वळवण्याचे आवाहन केले. यासाठी बँकेने “कृषीमित्र” योजना सुरू केली असून, पडीक जमिनीवर बांबू लागवड आणि ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी अवघ्या ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहा येथील प्रगतशील शेतकरी हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
तंत्रज्ञानात रायगड जिल्हा बँक देशात अव्वल
सहकार क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात रायगड बँकेने देशात इतिहास रचला आहे. “गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे १००% संगणकीकरण पूर्ण करणारी रायगड बँक ही भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली आहे,” असा अभिमान जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऑनलाइन व बायोमेट्रिक पद्धतीने पीक कर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, ७/१२ ची ऑनलाइन पडताळणी करून जलद व पारदर्शक कर्ज प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
शून्य टक्के नेट एनपीए आणि ९३.३७ कोटींचा नफा
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा प्रगतीचा ताळेबंद मांडला. बँकेने आपल्या व्यवसायात २७ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँकेने आपला ‘नेट एनपीए’ (Net NPA) शून्य टक्के राखून ९३.३७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सहकार क्षेत्रातील दिग्गज व गुणवंतांचा गौरव
या सोहळ्यात १,००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बँकेच्या ठेववाढीत उल्लेखनीय योगदान देणारे संचालक संतोष पाटील यांचाही सत्कार झाला.
विविध क्षेत्रातील सन्मानित मान्यवर:
- संरक्षण क्षेत्र: रायगड जिल्ह्यातील पहिले फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ मेहुल पाटील.
- कृषी क्षेत्र: कृषिभूषण दिलीपभाऊ शिंदे (महाड), प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रेय पाटील, मंदार पाटील (अलिबाग), हर्षद साळवी (रोहा).
- क्रीडा व शिक्षण: आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेणकर (महाड), शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी (अलिबाग) आणि आदर्श शिक्षक राजेश रामचंद्र भोईर (पेण).
- सामाजिक व पर्यावरण: आरसीएफ एक्स एम्प्लॉयी सोशल फोरम आणि ग्रीन अलिबाग संस्था.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व कर्मचारी:
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पेझारी (अलिबाग), पाच्छापूर (पाली), कोप्रोली (पेण), वरंध (महाड), नेरळ (कर्जत) आणि गोसावीबुवा (तळा) या सेवा सहकारी संस्थांचा गौरव करण्यात आला. तसेच ३६ वर्षे प्रामाणिक सेवा देणारे अधिकारी महेंद्र माळी आणि नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या सभेला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
