अनिकेत मोहित
श्रीवर्धन : श्रीवर्धन एसटी आगारातील डिझेलचा नियमित पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाला असून, याचा प्रचंड फटका स्थानिक बससेवेला बसत आहे. आगारात इंधन उपलब्ध नसल्याने गाड्यांना डिझेल भरण्यासाठी माणगाव आणि पेण आगाराचा फेरा मारावा लागत आहे. या अतिरिक्त प्रवासामुळे एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, प्रवासी, चालक आणि वाहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
इंधनासाठी ‘धावपळ’; आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय
यापूर्वी श्रीवर्धन आगारातच डिझेलचा नियमित पुरवठा होत असल्याने गाड्या वेळेवर सुटत असत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा अचानक बंद करण्यात आला आहे. परिणामी, प्रत्येक बसला नियोजित फेऱ्या पूर्ण करताना इंधनासाठी माणगाव किंवा थेट पेण आगार गाठावे लागत आहे. अनेकदा माणगाव आगारातही डिझेल संपलेले असते, अशा वेळी गाड्यांना पेणपर्यंत धाव घ्यावी लागते. या वाढीव अंतरामुळे एसटी महामंडळाचा इंधन खर्च व वेळ वाया जात असून, गाड्या वेळेवर चालवणे अशक्य झाले आहे.
प्रवाशांची कोंडी, कर्मचारी हतबल
एसटीच्या या विस्कळीत कारभारामुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. तासबेतास ताटकळत राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बस उशिरा आल्यामुळे प्रवाशांच्या रोषाला चालक व वाहकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, “इंधनच उपलब्ध नसल्याने आमचाही नाईलाज आहे,” अशी हतबलता एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी!
श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे किनारी आगार असून, येथून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या आगाराचा डिझेल पुरवठा बंद असणे ही गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तात्काळ लक्ष घालून श्रीवर्धन आगारातील डिझेल पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
