म्हसळा । वैभव कळस
म्हसळा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मैत्रीच्या बहाण्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही मुख्य आरोपीने (रहमान) तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून म्हसळा परिसरातील विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीने (स्थानिक मोमोज शॉपशी संबंधित) पीडितेशी गैरवर्तन करत अंगाला अयोग्य स्पर्श केला तसेच मुख्य आरोपीच्या कृत्यास प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी म्हसळा पोलीस ठाण्यात (गुन्हा क्रमांक १२५/२०२६) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६४(२), ६५(१), ७४ सह ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ४, ६, ८, १०, १२ व १७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून, कायदेशीर कार्यवाही व पुराव्यांची संकलन प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
