• Tue. Aug 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार; सात-आठ दिवसांत उच्चस्तरीय बैठकीचे आदेश

ByEditor

Aug 25, 2026

उरण । विठ्ठल ममताबादे
जेएनपीए (JNPA) प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा या दोन्ही गावांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी या प्रकरणी थेट पुढाकार घेतला असून, पुढील सात ते आठ दिवसांत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि चंद्रकांत घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मंत्रालयात पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ३३.६४ हेक्टर आणि शेवा कोळीवाड्यासाठी १७.०२ हेक्टर जमिनीशी संबंधित सविस्तर निवेदनासह विविध मागण्यांचे पत्र पालकमंत्र्यांना सोपवण्यात आले.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री गोगावले यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि कोकण विभागीय आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विस्थापितांचा हा प्रश्न अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा असून सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची अपेक्षा

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार येत्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त बैठकीस कोकण विभागीय आयुक्त, जेएनपीए चेअरमन, रायगड जिल्हाधिकारी, सिडको एमडी आणि ग्रामस्थांची कमिटी उपस्थित राहणार आहे. राज्य सरकारच्या या थेट हस्तक्षेपामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, आता केवळ आश्वासने न मिळता पुनर्वसनाचा प्रश्न प्रत्यक्ष अंमलबजावणी करून कायमचा मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!