उरण । अनंत नारंगीकर
उरण शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, स्कूटी आणि बैलामध्ये झालेल्या भीषण धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा करुण अंत झाला आहे. महेंद्र झामनदास सहतिया (वय ५५) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
द्रोणागिरी येथील ‘प्रजापती प्राईड’ इमारतीत राहणारे महेंद्र सहतिया हे पत्नी रेणु सहतिया (वय ५५) यांच्यासह स्कूटीवरून जात असताना अचानक समोर आलेल्या बैलाशी त्यांची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दांपत्य रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोघांनाही तात्काळ इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती रात्री ९:३० वाजता महेंद्र सहतिया यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश कोंडाळकर पुढील तपास करत आहेत. मोकाट जनावरांमुळे घडलेल्या या अपघातामुळे द्रोणागिरी व उरण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
