उरण । घनःश्याम कडू
उरण शहरात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप नागरिकाला बसला आहे. बोरी नाका परिसरात मोकाट बैलाने दिलेल्या भीषण धडकेत महेंद्र सहतिया या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत उरणकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सहतिया हे आपल्या पत्नीसह अॅक्टिवावरून जात असताना बोरी नाका येथे अचानक आलेल्या एका मोकाट बैलाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने महेंद्र सहतिया यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण शहरातील रस्त्यांवर गुरे, बैल, घोडे आणि मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मोकाट बैलाने केलेल्या हल्ल्यात एक नागरिक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीवर आणि डोक्यावर मिळून ३५ हून अधिक टाके पडले होते. या घटनेनंतरही पालिका प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
नागरिकांनी तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्याने अखेर एका कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे. “कर वसूल करताना तत्पर असणारे पालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत इतके उदासीन का?” असा थेट सवाल आता उरणकर विचारत आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
