• Wed. Aug 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटात २० फूट दरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

ByEditor

Aug 26, 2026

माणगाव । सलीम शेख
ताम्हिणी घाटातील दरीमध्ये एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घाटातील एका महिंद्रा थार वाहनाचा अपघात झालेल्या परिसरातील सुमारे २० फूट खोल दरीत हा मृतदेह दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी ‘एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम, कोलाड’ आणि ‘शेलार मामा रेस्क्यू टीम, भिरा (माणगाव)’ यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाने मदतकार्य राबवले. रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आला.

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहाच्या डाव्या हातावर स्टार व विंचवाचा टॅटू, तर उजव्या हातावर राम आणि ओम असा टॅटू गोंदवलेला आहे. तसेच अंगात लालसर रंगाचा टॉप, काळी लेगीज आणि निळ्या रंगाची ओढणी असा पेहराव आहे.

सदर महिलेचा अपघात झाला की तिची हत्या करून मृतदेह दरीत फेकून देण्यात आला, या दोन्ही शक्यतांच्या दृष्टीने माणगाव पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. थार अपघाताच्याच परिसरात हा मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!