• Fri. Jul 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हरिहरेश्वरच्या MTDC बीचवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

ByEditor

Jul 10, 2026

मुसळधार पावसात महाड परिसरातून वाहून आल्याचा प्राथमिक संशय

​ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांचे नागरिकांना आवाहन


​संदेश घोलप
श्रीवर्धन :
रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हरिहरेश्वर येथील एमटीडीसी (MTDC) बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात आणि वादळात हा मृतदेह महाड परिसराकडून वाहून आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. पाहूयात यासंदर्भातील आमचा हा सविस्तर रिपोर्ट…

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्ट जवळील समुद्रकिनाऱ्यावर आज एक मृतदेह किनाऱ्यालगत स्थानिक नागरिकांना दिसून आला. किनाऱ्यावर मृतदेह पाहताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना दिली. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर काढला आणि त्याचा पंचनामा केला.

गेल्या आठवड्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाड परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. महाड येथील सावित्री नदीचे पाणी थेट समुद्राला मिळत असल्याने, या मुसळधार पावसात आणि वादळात महाड परिसरातून नदीपात्राद्वारे हा मृतदेह वाहून थेट हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्या हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. या मृतदेहाबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास किंवा गेल्या काही दिवसांत महाड अथवा श्रीवर्धन परिसरातून कोणी बेपत्ता झाले असल्यास, तातडीने श्रीवर्धन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!