माणगाव : प्रशासनाने घातलेली बंदी आणि पोलीस बंदोबस्त झुगारून पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पुण्याच्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील दोन पर्यटक पाण्यात बुडून बेपत्ता झाले. पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून १७ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देवकुंड धबधबा परिसरात आला होता. दुपारच्या सुमारास हे पर्यटक धबधब्याच्या मुख्य प्रवाहात उतरले. मात्र, पावसाळ्यातील पाण्याच्या प्रचंड वेगाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने, या गटातील दोघे जण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले.
बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच माणगाव स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तात्काळ कोलाड येथील विशेष बचाव पथकाला (Rescue Team) पाचारण करण्यात आले. रविवारी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र अद्याप पर्यटकांचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
३१ ऑगस्टपर्यंत पर्यटनाला बंदी, तरीही उल्लंघन!
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने आधीच देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि ‘सिक्रेट पॉइंट’ या संपूर्ण परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनास कडक बंदी घातली आहे. माणगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. असे असतानाही, पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घातला जात असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
या संपूर्ण प्रतिबंधित परिसरात पोलीस आणि वन विभागाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. असे असतानाही १७ पर्यटकांचा हा गट प्रतिबंधित क्षेत्रात नेमका पोहोचला कसा? सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून हे पर्यटक आत कसे गेले? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत असून, प्रशासनाकडून या निष्काळजीपणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
