• Mon. Jul 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंड्यात ‘एसआयआर’ मोहिमेचा फज्जा? बीएलओ शाळेतच ठाण मांडून; गावोगावी जनजागृती करणार कोण?

ByEditor

Jul 13, 2026

​रेवदंडा | प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेचा रेवदंडा परिसरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून मतदार यादी अद्ययावत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असताना, बहुतांश बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) गावोगावी फिरण्याऐवजी स्थानिक शाळांमध्येच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​घराघरांमध्ये जाण्याऐवजी एकाच ठिकाणी ठिय्या

​निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, ‘बीएलओ’ यांनी मतदारांच्या घराघरांमध्ये जाऊन माहितीची पडताळणी करणे, नवीन मतदार नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे बंधनकारक आहे. मात्र, रेवदंडा परिसरात ‘बीएलओ’ एकाच ठिकाणी बसून केवळ अर्ज स्वीकारण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

​स्वतःहून केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांची कामे होत असली, तरी ज्यांना या मोहिमेची माहिती नाही, असे शेकडो मतदार प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

​वयोवृद्ध आणि दिव्यांगांचे हाल; जनजागृतीचा अभाव

​’बीएलओ’ गावोगावी फिरत नसल्यामुळे खालील घटकांना मोठा फटका बसत आहे. चालण्या-फिरण्यास असमर्थ असलेल्या या मतदारांपर्यंत प्रशासन पोहोचलेले नाही. कामानिमित्त दिवसभर बाहेर असणाऱ्या मतदारांना प्रक्रियेत सामावून घेण्याचे कोणतेही नियोजन नाही. पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे हवीत, अंतिम मुदत कोणती आणि अर्ज कुठे करायचा, याची कोणतीही ठोस माहिती अद्ययावत करण्यात आलेली नाही. ‘एसआयआर’ ही घराघरांत जाऊन मतदार पडताळणी करण्याची मोहीम आहे की एका शाळेत बसून कागदपत्रे गोळा करण्याचा निव्वळ कार्यक्रम? प्रशासनाने मतदारांपर्यंत पोहोचायचे की मतदारांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवायचे?

​वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

​’एसआयआर’ मोहिमेतील त्रुटींमुळे अनेक पात्र मतदार यादीतून सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ रेवदंडा परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन ‘बीएलओ’च्या कामकाजाची पाहणी करावी, तसेच क्षेत्रात जाऊन प्रभावीपणे मोहीम राबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रेवदंड्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!