सागर पेरेकर
अलिबाग : येथील मुख्य समुद्रकिनाऱ्यावर दारूच्या नशेत समुद्रात उतरलेल्या एका पर्यटकाचा जीव वाचवण्यात स्थानिक जीवरक्षकांना यश आले आहे. जीवरक्षकांनी दाखवलेल्या अचाट धाडसामुळे आणि सतर्कतेमुळे आज दुपारी मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख (वय अंदाजे ३०, रा. केलवली फाटा, पुणे) हा पर्यटक आपल्या मित्रांसोबत अलिबाग येथे फिरायला आला होता. दुपारी भरतीच्या वेळी, जीवरक्षकांचे लक्ष चुकवून तो थेट समुद्रात पोहण्यासाठी उतरला. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि काही वेळातच तो किनाऱ्यापासून दूर खोल पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला.
शाहरुख पाण्यात बुडत असल्याचे किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता जीवरक्षक कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांनी भरतीच्या उधाणात समुद्रात उड्या घेतल्या. किनाऱ्यापासून तब्बल १०० ते १५० मीटर अंतरावर खोल पाण्यात जाऊन त्यांनी मृत्यूच्या दाढेतून शाहरुखला सुखरूप बाहेर काढले.
समुद्रातून बाहेर काढल्यानंतर शाहरुखला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. वेळेत मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अलिबागच्या या जीवरक्षकांनी दाखवलेली सतर्कतेची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच याच पथकाने ठाणे जिल्ह्यातील सात पर्यटकांनाही अशाच प्रकारे समुद्रात बुडण्यापासून वाचवले होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी देवदूत ठरलेल्या या जीवरक्षकांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत समुद्रात उतरू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
