• Thu. Aug 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटातील महिला हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; पिंपरी-चिंचवडमधून दोन संशयितांना अटक

ByEditor

Aug 27, 2026

माणगाव । सलीम शेख
ताम्हिणी घाटातील दरीत २५ ऑगस्ट रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे २४ तासांत हत्येचा छडा लावत दोन संशयितांना पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे.

दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (वय २७, दोघे रा. कुंदलवाडी, चिखली, पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडेथर गावच्या हद्दीत (पुणे-माणगाव मार्ग) एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह दरीमध्ये बेवारस अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिला सुमन गोपाल यादव (रा. चिखली, पुणे; मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले.

हवापालटाच्या बहाण्याने नेऊन हत्या

महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या संपर्कातील संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान प्रजापती बंधूंवर संशय बळावल्याने पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमधून त्यांना ताब्यात घेतले. “महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात आणून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली व मृतदेह दरीत फेकून दिला,” अशी कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान दिली आहे.

पोलीस पथकाची धडक कारवाई

रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक सुरज पाटील, नरेश निंबाळकर आणि सायबर सेलचे हवालदार तुषार घरत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!