• Thu. Aug 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमा उत्साहात; समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून मच्छीमारांचे साकडे

ByEditor

Aug 27, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी गुरुवारी पारंपरिक आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. समुद्र शांत राहावा, मच्छीमार बांधवांचे नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण व्हावे आणि समुद्रदेवतेची कृपादृष्टी कायम राहावी, या श्रद्धेने किनाऱ्यावर विधीवत पूजन करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.

श्रीवर्धन परिसरातील किनारपट्टीच्या गावांमध्ये नारळी पौर्णिमेची ही अनोखी परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जाते. या सोहळ्याचा एक भाग म्हणून श्रीवर्धन शहरातील विविध समाजांच्या वतीने समुद्रदेवतेचे पूजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच समुद्रात काम करणाऱ्या बांधवांच्या सुरक्षिततेसाठी यावेळी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

भंडारी समाज श्रीवर्धन-दांडा यांच्या वतीने समुद्रकिनारी विशेष धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. आगामी काळात येणारी वादळे, आपत्ती आणि समुद्रातील धोक्यांपासून मच्छीमार बांधवांचा बचाव व्हावा, असे साकडे समाजबांधवांनी समुद्रदेवतेला घातले.

बदलत्या काळातही कोकणातील सागरी संस्कृती आणि समुद्राशी असलेले नाते जपल्याचे चित्र या निमित्ताने श्रीवर्धनकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!