म्हसळा । वैभव कळस
हिंदू ग्रामस्थ मंडळ, म्हसळा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक आणि दर्या पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत म्हसळा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
श्री धावीर मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक तांबट-सोनार आळी, पोलीस ठाणे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे गणपती विसर्जन घाटावर पोहोचली. विसर्जन घाटावर पुरोहित महेश जोशी यांच्या मंत्रोच्चारात समुद्रदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सामूहिक आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी व शांततेसाठी प्रार्थना करत समुद्राला सोनेरी नारळ अर्पण करण्यात आला.
या उत्सवाला उपविभागीय पोलीस अधिकारी योगिता कुटे, हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर, म्हसळा ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशील यादव, नगराध्यक्ष सुनील शेडगे, माजी अध्यक्ष संजय कर्णिक, माजी सभापती महादेव पाटील, तालुका सचिव महेश पवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, तसेच रणजीत जैन, गौरव पोतदार, दादा पानसरे, महेंद्र ढवळे, मंगेश म्हशीलकर आणि संतोष कुडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यामुळे म्हसळा शहरात धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
