• Mon. Jul 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देवकुंड दुर्घटना: २४ तासांच्या शोधमोहिमेनंतर दोन्ही पर्यटकांचे मृतदेह हाती; बंदी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता!

ByEditor

Jul 13, 2026

सलीम शेख
​माणगाव :
भिरा येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारपासून सुरू असलेल्या तब्बल २४ तासांच्या अथक रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर सोमवारी (१३ जुलै) दुपारी दोन्ही पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. गोपाळ रामलाल राठोड (वय २२) आणि विष्णू विलास ढोख (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासकीय बंदी आदेशांच्या अंमलबजावणीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​चोरवाटेने केला प्रवेश

​माणगाव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत देवकुंड, ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉईंट यांसारख्या धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांना स्पष्ट बंदी लागू केली होती. परिसरात पोलीस व वनविभागाचा बंदोबस्तही तैनात होता. पुण्यातून आलेल्या २१ पर्यटकांच्या गटाला सुरुवातीला पोलिसांनी परत जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, या गटाने म्हसेवाडी परिसरातील चोरवाटेने बंदी झुगारून देवकुंड परिसरात प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

​२४ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

​रविवारी हे दोन्ही तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिक स्वयंसेवक, शेलारमामा रेस्क्यू टीम, एसव्हीआरएसएस पथक आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. रविवारी सायंकाळी अंधार पडल्याने मोहीम थांबवावी लागली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली. अखेर दुपारी दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले.

​केवळ ‘कागदी’ आदेश; प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी?

​देवकुंड परिसरात जीवितहानी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक दुर्घटनेनंतर प्रशासन कठोर कारवाईची घोषणा करते, बंदी आदेश काढले जातात. परंतु, जमिनीवर परिस्थिती जैसे थेच राहते. या दुर्दैवी घटनेने खालील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:

​चोरवाटा खुल्या कशा?: प्रशासकीय बंदी असतानाही पर्यटकांना आत घेऊन जाणाऱ्या चोरवाटा अद्याप बंद का करण्यात आलेल्या नाहीत?

​सुरक्षेचे दीर्घकालीन नियोजन शून्य: दरवर्षी पावसाळ्यात बंदीचे आदेश काढण्यापलीकडे वन विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडे ठोस सुरक्षा आराखडा का नाही?

​जबाबदारी कोणाची?: या दुर्घटनेला केवळ पर्यटकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे की यंत्रणेची शिथिलता?

देवकुंड हा आता केवळ पर्यटनाचा आल्हाददायक पॉईंट राहिलेला नसून सुरक्षित पर्यटन व्यवस्थापनाचा एक गंभीर प्रश्न बनला आहे. प्रशासन, पोलीस, वन विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी एकत्रित आढावा घेऊन जबाबदारी निश्चित केली नाही, तर दर पावसाळ्यात अशा निष्पाप बळींचे सत्र सुरूच राहील, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!