नागपूर: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि अत्याधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. रेल्वे फाटकांवर होणारे अपघात पूर्णपणे रोखण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांच्या (ROB) बांधकामाला प्राधान्य देण्यात येत असून, संपूर्ण महाराष्ट्र ‘रेल्वे फाटकमुक्त’ केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूरमधील वर्धमाननगर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (महारेल) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पांच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.
या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर निता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार: मुख्यमंत्री
लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “रेल्वे फाटकांवर होणाऱ्या अपघातांमुळे दरवर्षी देशभरात सुमारे २१ हजार लोकांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आम्ही ‘फाटकमुक्त महाराष्ट्र’ संकल्पना राबवत आहोत. राज्यात सध्या ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, १० हजारांपेक्षा जास्त ‘टीव्हीयू’ (ट्रॅफिक व्हेईकल युनिट) असलेल्या गजबजलेल्या फाटकांसह इतर १४५ पुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. ‘महारेल’च्या माध्यमातून ही सर्व कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण केली जातील.”
‘महारेल’च्या कामाचे आणि तंत्रज्ञानाचे कौतुक
मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘महारेल’च्या कामगिरीचा गौरव केला. नागपूर आणि मुंबईतील अत्यंत कठीण व आव्हानात्मक पुलांची कामे महारेलने अत्यंत कमी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली आहेत. महारेलने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी त्यांना पेटंट मिळाले असून, कमी खर्चात उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे त्यांचे मॉडेल कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नागपूरचा चौफेर विकास आणि रोजगाराची निर्मिती
नागपूर शहरात रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाल्यामुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधांमुळे नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ बनत असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. यामुळे शहराचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्गावरील नवनिर्मित रेल्वे ओव्हर ब्रिजला नागपूरच्या माजी महापौर ‘बाहरीनबाई सोनबोईर’ यांचे नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
