• Mon. Jul 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना मोठी दुर्घटना; मुंबईच्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

ByEditor

Jul 13, 2026

राफ्टिंग व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना? धोकादायक व्यवसाय बंद करण्याची स्थानिकांची मागणी

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात सुरू असणारी ‘रिव्हर राफ्टिंग’ पर्यटकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. शनिवार, ११ जुलै रोजी राफ्टिंगचा आनंद घेताना मुंबई येथील मनोज अमरनाथ (वय २६) या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कुंडलिका नदीमध्ये साजे, येरळ, धगडवाडी, आंबिवली आणि कामत या नदीपात्रात गेल्या १५ वर्षांपासून राफ्टिंगचा व्यवसाय सुरू आहे. पावसाळ्यात या साहसी खेळाचा आनंद घेण्यासाठी केवळ राज्यातूनच नव्हे, तर जगभरातून लाखो पर्यटक येथे हजेरी लावतात. मात्र, गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अपघातांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. राफ्टिंग व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे आणि अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारच्या दुर्घटनेत मुंबईच्या निष्पाप तरुणाचा हकनाक बळी गेल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पर्यटकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या धोकादायक राफ्टिंग व्यवसायावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत पुरेशी सुरक्षितता सुनिश्चित केली जात नाही, तोपर्यंत ही राफ्टिंग पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवसाय एका परप्रांतीय व्यावसायिकाच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या व्यवसायाचा कोणताही आर्थिक फायदा मिळत नाही. गेल्या ४-५ वर्षांत स्थानिक तरुण आणि छोट्या व्यावसायिकांना या पर्यटन व्यवसायातून डावलण्यात आल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात संताप

कुंडलिका नदीतील वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परप्रांतीय मक्तेदारी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांचे बळी जात असून, यावर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!