• Mon. Jul 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुख्याधिकाऱ्यांच्या मुजोर कारभाराविरोधात माणगावच्या ग्रामस्थांचा तीव्र निषेध!

ByEditor

Jul 13, 2026

पाण्याच्या प्रश्नावर वेळ देऊनही मुख्याधिकारी अनुपस्थित; नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा

सलीम शेख
माणगाव :
माणगाव नगरपंचायत वॉर्ड क्र. १७ मधील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला व कुंभार आळी येथील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. या गंभीर पाणी प्रश्नासंदर्भात चर्चेकरिता वेळ देऊनही ऐनवेळी अनुपस्थित राहणाऱ्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मुजोर वागणुकीचा वॉर्ड क्र. १७ मधील संतप्त ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयातच जाहीर निषेध केला. या संदर्भात मुख्याधिकारी माळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ‘नंतर कॉल करतो’ असे सांगून सायंकाळी उशिरापर्यंत आपली बाजू मांडणे टाळले.

जुने माणगाव मस्जिद मोहल्ला व कुंभार आळी येथील ग्रामस्थांची स्वतंत्र पाणी योजना असून ती काही काळापूर्वी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, येथील पाण्याचा पंप बिघडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत वॉर्डाचे नगरसेवक दिनेश रातवडकर यांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामस्थांना नगरपंचायत कार्यालयात बोलाविले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्याधिकारी स्वतःच या बैठकीला गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर नगरसेवक व ग्रामस्थांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मानवी जीवनातील पाणी या अत्यंत मूलभूत गरजेकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून केवळ चालढकलपणा केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

यावेळी नगरपंचायत कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार, पाणी पुरवठा सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक राजेश मेहता, नगरसेवक कपिल गायकवाड, स्थानिक नगरसेवक दिनेश रातवडकर, मस्जिद मोहल्ला अध्यक्ष सिद्दिक परदेशी, उपाध्यक्ष महंमदअली धुनवारे यांच्यासह दोन्ही भागांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपस्थित नगरसेवक व पाणी पुरवठा सभापती यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. पाणी पंप दुरुस्त होईपर्यंत व हा प्रश्न कायमचा निकाली लागेपर्यंत नागरिकांना टँकरने मुबलक पाणी पुरवठा स्वखर्चाने करण्यात येईल, असे आश्वासन वॉर्डचे नगरसेवक दिनेश रातवडकर यांनी दिले. याबद्दल मस्जिद मोहल्ला अध्यक्ष सिद्दिक परदेशी यांनी नगरसेवक रातवडकर यांचे जाहीर आभार मानले. मात्र, त्याच वेळी प्रशासनाने हा पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसांत कायमस्वरूपी सोडविला नाही, तर नगरपंचायतीवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही परदेशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!