सोशल मीडियावरील बेकायदेशीर बुकिंग पोलिसांच्या रडारवर; बंदी झुगारणाऱ्यांची आता खैर नाही
सलीम शेख
माणगाव : भिरा येथील देवकुंड धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी मृत पर्यटकांसोबत आलेले सहकारी, स्थानिक गाईड आणि पर्यटकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर बुकिंग करणाऱ्या अशा एकूण २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. १३) सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी ही माहिती दिली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर गाईड व आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
सोशल मीडियावरील रॅकेटचा होणार पर्दाफाश
देवकुंडसह परिसरातील अन्य प्रतिबंधित पर्यटनस्थळांवर पर्यटकांना नेण्यासाठी नेमके कोण बुकिंग घेत आहेत आणि सोशल मीडियाद्वारे पर्यटकांना कोण आकर्षित करत आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याचे निरीक्षक बांगर यांनी स्पष्ट केले. फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल कॉल आणि ई-मेलच्या माध्यमातून पर्यटकांना आमिष दाखवून बेकायदेशीर बुकिंग करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. या दुर्घटनेनंतरही काही गट सोशल मीडियावर बुकिंग घेत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली असून, अशा सर्व ग्रुप्सवर पोलिसांची करडी नजर आहे. प्रतिबंधित परिसराच्या एक किलोमीटर परिघात आढळणारे पर्यटक, स्थानिक गाईड आणि संशयितांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
पर्यटकांना कडक इशारा
सद्यस्थितीत देवकुंड, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट आणि कुंभे धबधबा या पर्यटनस्थळांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश (कलम १४४) लागू केले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी जाण्याचे धाडस करू नये. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच अशा दुर्घटनांना कारणीभूत ठरणार्या प्रत्येक घटकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
२४ तासांनंतर हाती आले मृतदेह
भिरा येथील देवकुंड धबधब्यावर गोपाळ रामलाल राठोड (वय २२) आणि विष्णू विलास ढोक (वय २३) हे दोन तरुण सुमारे ५० फूट खोल पाण्यात अडकून बेपत्ता झाले होते. घटनेनंतर स्थानिक स्वयंसेवक, शेलारमामा रेस्क्यू टीम, एसव्हीआरएसएस पथक आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी सायंकाळी अंधारामुळे मोहीम स्थगित करावी लागली. सोमवारी सकाळी पुन्हा अत्याधुनिक उपकरणे आणि अंडरवॉटर कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
प्रशासनाचे आवाहन
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याचवेळी प्रतिबंधित पर्यटनस्थळांवरील सुरक्षा, बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी आणि बेकायदेशीर पर्यटन व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, बेकायदेशीर पर्यटन साखळीतील प्रत्येक घटकाचा शोध घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पावसाळ्यात जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटनाला बळी न पडता, प्रशासनाने लागू केलेल्या बंदी आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
