• Tue. Jul 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वैभव पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सीईओंचे आदेश; पालन न झाल्यास उरण बीडीओंवरही कारवाईचा इशारा

ByEditor

Jul 14, 2026

खालापूर पंचायत समितीला तातडीने कार्यमुक्तीचे निर्देश; अधिकृत आदेशांमुळे दोन्ही पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय खळबळ

विठ्ठल ममताबादे
उरण :
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेहा भोसले यांनी खालापूर पंचायत समितीअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत केगावचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात उरण पंचायत समितीला आवश्यक कायदेशीर कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून, आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित गट विकास अधिकाऱ्यांवर (बीडीओ) शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा अधिकृत पत्रातून देण्यात आला आहे.

सीईओ कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, वैभव पाटील यांनी केगाव ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामनिधी व ग्रामपंचायतीच्या नोंदींसंदर्भात विभागीय चौकशीत गंभीर अनियमितता निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उरण पंचायत समितीला देण्यात आले आहेत.

सीईओ कार्यालयाने उरण पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे नमूद करत, विहित मुदतीत आदेशांचे पालन न झाल्यास ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ मधील नियम १० अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, स्वतंत्र आदेशाद्वारे खालापूर पंचायत समितीला वैभव पाटील यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशानुसार, त्यांची २ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती सुधागडअंतर्गत नवघर ग्रामपंचायतीत पदस्थापना करण्यात आली होती. मात्र अद्याप कार्यमुक्त न झाल्याबाबत १ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

यामुळे खालापूर पंचायत समितीला वैभव पाटील यांना तात्काळ कार्यमुक्त करून सेवापुस्तकात आवश्यक नोंदी कराव्यात तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सीईओ कार्यालयाच्या या आदेशांमुळे उरण आणि खालापूर पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, पुढील कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!