सागर पेरेकर
अलिबाग : महाड तालुक्यातील आकले गावाजवळील काळ नदीला अचानक आलेल्या मुसळधार पुरात बेटावर अडकलेल्या दोन युवकांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाला यश आले आहे. बुधवारी (१५ जुलै) सायंकाळी ही थरारक बचाव मोहीम राबवण्यात आली. आदिल शकील खान (वय २७, रा. बिरवाडी) आणि शबू (वय ३२, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे दोघे सायंकाळी काळ नदीपात्रातील एका बेटावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, त्याच वेळी वरच्या डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वेगाने वाढ झाली आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही बेटावरच अडकून पडले.
या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. उपनिरीक्षक सुशांत के. सेठी यांच्या नेतृत्वाखालील एनडीआरएफचे पथक, महाड आपत्ती व्यवस्थापन पथक, नौका विभाग आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे तात्काळ मदतकार्य सुरू केले. पाण्याचा प्रवाह तीव्र असतानाही अत्यंत शिताफीने प्रयत्न करत दोन्ही युवकांना सुखरूप नदीबाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत दोन्ही युवकांना कोणतीही दुखापत झाली नसून, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाळ्यात नदी, ओढे आणि धबधब्यांच्या ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
