पुण्यात रंगणार शिबिर; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण
क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) तीन गुणवान युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) आगामी निवड चाचणी शिबिरात स्थान मिळवले आहे. यामध्ये पेणचा कौस्तुभ म्हात्रे, उरणचा अमेय पाटील आणि महाडची रोशनी पारधी यांचा समावेश असून, या निवडीमुळे जिल्ह्यातील क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
या तिन्ही खेळाडूंनी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांची वेगवेगळ्या वयोगटांतील मुख्य शिबिरासाठी २३ वर्षांखालील मुलांच्या गटात कौस्तुभ म्हात्रे (पेण), १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अमेय पाटील (उरण) तर महाराष्ट्राच्या वरिष्ठ (सिनियर) महिला संघ निवड चाचणी शिबिरासाठी रोशनी पारधी (महाड) हिची निवड करण्यात आली आहे:
हे महत्त्वपूर्ण निवड चाचणी शिबिर पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या मुख्य संघांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना महाराष्ट्राच्या मुख्य संघात स्थान मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
रायगडच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी तिन्हींचे कौतुक केले आहे. भविष्यात महाराष्ट्राच्या मुख्य संघात स्थान मिळवून या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्यातील खेळाडू सातत्याने महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवत असल्याने जिल्ह्यातील इतर युवा खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळत आहे.
