८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त; बदलापूर आणि ठाण्यातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
फरार चार सहकाऱ्यांचा शोध सुरू; मुख्य आरोपींवर १७ गंभीर गुन्हे दाखल
उरण । घनःश्याम कडू
घरात महिला एकटी असल्याचा फायदा उठवून भररात्री घराचे कौल काढून आत घुसायचे, चाकूचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटायचा, असा धक्कादायक प्रकार गव्हाणगाव येथे घडला. मात्र, दरोडेखोरांचा हा डाव उलवा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उधळून लावत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फरार चार सहकाऱ्यांचा कसून शोध सुरू आहे.
गव्हाणगाव येथील शेवंती धाया कोळी (वय ५३) या घरी एकट्याच राहत असल्याची पक्की माहिती दरोडेखोरांना होती. या माहितीचा गैरफायदा घेत १८ ऑगस्ट रोजी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास आरोपींनी घराचे कौल काढून छतातून आत प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून ७ लाखांचे सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ९ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून उलवा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांचे पथक बदलापूर व ठाणे येथे पोहोचले. तेथून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून गव्हाणगावातील अन्य तीन स्थानिक साथीदारांची माहिती समोर आली. पोलिसांनी या तिघांनाही तातडीने ताब्यात घेतले.
कारवाईत रोहित शांताराम मालुसरे (वय २७, रा. बदलापूर), सुरज राजू गायकवाड (वय १९, रा. बदलापूर), दीपेश सुरेश भोईर (वय २३, रा. गव्हाण गाव), प्रवीण सदानंद कोळी (वय ३१, रा. गव्हाण गाव) आणि फरहान अल्ताफ शेख (वय १९, रा. गव्हाण गाव) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ४ लाखांची होंडा जॅझ कार, २ लाखांची केटीएम मोटारसायकल, ७५ हजारांची ॲक्सेस स्कूटर, चार महागडे मोबाईल आणि ४५ हजारांची रोकड असा एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक आरोपींपैकी रोहित मालुसरे याच्यावर एमएमआर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी आणि हत्यार बाळगण्यासह १७ गुन्हे दाखल आहेत. तर सुरज गायकवाड याच्यावर घरफोडी आणि खुनाचा गुन्हा नोंद आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (परी-२) अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट) विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उर्वरित फरार चार आरोपींनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
